PUNE : चांदणी चौकात लगबग सुरू; ‘या’ दिवशी गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन

कोथरूड – चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अवघे दोन दिवस राहिले असताना चौकात पेंडॉल उभा करणे, रस्ते साफ करणे, खड्डे भरणे यासह सुशोभिकरणाला गती मिळाली. दरम्यान, 12 ऑगस्टला सकाळी 11 वाजता चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.
उद्घाटनानंतर काहीवेळातच हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलावर मोठा पेंडॉल आणि स्टेज उभारण्यात आले आहे. एनडीएकडून चौकाचे सुशोभिकरण सुरू असून याठिकाणी रणगाडा, जहाज आणि लढावू विमान ठेवण्यात आले आहे. यामध्ये “मिग 27′ हे लढाऊ विमान असून रणगाडाही युद्धातील असल्याने चौकातील हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. दरम्यान, नवीन टेक्नोलॉजी वापरून हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाच्या सर्व प्रकारच्या टेस्टींग करण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने भरले डंपर पुलावर उभे करून वजन कॅपेसिटीचीही तपासणी करण्यात आली आहे. तसेच पुलाच्या बाहेरील बाजूच्या मोकळ्या जागेत सुरक्षा कठडे, लोखंडी रेलिंग लावण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात पुलाचे फायनल फिनिशिंग पूर्ण होईल, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून सांगण्यात आले.
सेल्फीसाठी नागरिकांची गर्दी…
भव्य-दिव्य उड्डाणपूल, चकाचक केलेले डांबरीकरण आणि त्यावरील पांढरे पंढरे, चौकातील रणगाडा, विमान, जहाज आणि दुभाजकावरील सुशोभिकरण यामुळे सकाळ-संध्याकाळ या परिसरात फिरायला येणारे नागरिक क्षणभर थांबून पाहणी करत आहे. तर काही हौसी सेल्फी घेत फोटो आपले स्टेटसला ठेवून “कमिंग सुन’ असे लिहिले जात आहे. त्यामुळे बघणाऱ्यांची मोठी गर्दी वाढत आहे.





