प्रभात वृतसेवा पुणे – महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर झालेली असतानाच या प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे. ही रचना करताना राष्ट्रवादीला रोखण्यासाठी नव्याने समाविष्ट गावांचे प्रभाग मोठे करण्याची खेळी केल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.प्रामुख्याने वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांच्या शहरी भागात राष्ट्रवादीला अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये महायुती झाली, तरी या भागात कमी नगरसेवक कसे निवडून येतील, याची खबरदारी भाजपने घेतली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवरून नाराज शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादीही थेट मुंबईकडे आपला मोर्चा वळविणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पुण्यात ४२ नगरसेवक होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीत फूट पडली असली, तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादीला चांगले मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीला चांगले मतदान झाले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शहरातील बहुतांश माजी नगरसेवकांनी अजित पवारांसोबत जात आपला कल स्पष्ट केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीतील वादामुळे या दोन्ही पक्षांचे उमेदवारच आमने सामने येतील, असेही चित्र आहे. परिणामी दोन्ही राष्ट्रवादींसाठी समाविष्ट गावांमध्ये, तसेच उपनगरांमध्ये मोठे प्रभाग केल्यास त्यांना थोपविणे शक्य असल्याने समाविष्ट गावांचे प्रभाग मोठे केले असल्याची चर्चा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांत नाराजी.. प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर प्रभाग रचनेबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करण्याचे निश्चित झाले. मात्र, त्यानंतर भाजपकडून कोणतेही आदेश वरिष्ठांकडून आले नसल्याचे सांगत शिवसेना व राष्ट्रवादीला दूर ठेवल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेना, तसेच राष्ट्रवादीचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत. आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीने या प्रकरणाची तक्रार थेट अजित पवार यांच्याकडे केली आहे. प्रभाग रचनेचा चेंडू आता नगरविकास विभागाच्या कोर्टात गेल्याने मुंबईतील घडामोडींकडे या तीनही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.