प्रभात वृत्तसेवा पुणे – निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसारच प्रभाग रचना तयार केली आहे. पूर्वीपेक्षा अधिक चांगली रचना केली असून, ती जाहीर होण्याआधीच आरोप करणे चुकीचे आहे. त्यामुळे काही आक्षेप असतील, तर प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकत घेण्याची सर्वांनी संधी आहे, असा खुलासा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे.महापालिकेच्या प्रभाग रचनेत प्रशासकीय हस्तक्षेप झाला असून, प्रशासनाने भाजपच्या दबावाखाली प्रभाग रचना केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे, तसेच याबाबत महापालिका आयुक्तांकडे निषेधही नोंदविला आहे. याबाबत बोलताना आयुक्तांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेत प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आल्याचेही ते म्हणाले.आयुक्त राम म्हणाले, की प्रभाग रचना करताना कोणतेही नियम तोडण्यात आलेले नाहीत. प्रभाग रचना न पाहताच आरोप करणे योग्य नाही. ज्यांना आक्षेप आहेत, त्यांनी प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर हरकती नोंदवाव्यात. मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर असतानाचा दिवस सोडल्यास इतर कोणत्याही वेळी मी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना भेट नाकारलेली नाही. ही प्रभाग रचना ४ सदस्यांची असल्याने ती २०१७ च्या धर्तीवर आणि आयोगाने निश्चित करून दिलेल्या नियमावलीनुसारच करण्यात आली आहे. त्यात कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. याशिवाय हे सर्व गोपनीय पद्धतीने करण्यात आले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत ३२ गावे वाढली आहेत आणि त्यांची लोकसंख्याही ४ लाखांनी वाढली आहे. त्यामुळे मागील प्रभाग रचनेच्या आधाराने केलेल्या या प्रभाग रचनेत काही प्रभाग मोठे होण्याची शक्यता असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.