प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांकडून राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) मूल्यांकनाकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या तब्बल ११६ महाविद्यालयांना आता नव्याने होणाऱ्या बायनरी नॅक मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जाण्याचे सक्त निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. विद्यापीठाशी संलग्न होऊन पाच वर्षे पूर्ण झालेली किंवा त्याहून अधिक काळ लोटूनही अद्याप एकदाही नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांना येत्या तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना कळवले असून, जनजागृतीसाठी प्रशासन आग्रही भूमिका घेत आहे. दरम्यान, नॅक मूल्यांकन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे, वेळेची आणि पैशांची बचत करणे, या उद्देशाने महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यापुढे बहुतांश मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामुळे मूल्यांकनकर्त्यांची जबाबदारी निश्चित होऊन भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या संलग्नता कक्षाने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता ११६ महाविद्यालयांना तातडीने नॅकची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. नॅककडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.