प्रभात वृत्तसेवा पुणे – कल्याणीनगरमधील एका महिलेसह पाच जणांविरोधात येरवडा पोलिसांनी खंडणीसह धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी मुंबईतील गँगस्टरच्या नावाने धमकी देत सव्वाकोटींची खंडणी मागितली होती.फिर्यादी कॉन्ट्रॅक्टरने २०१८ मध्ये ज्युली विनय चार्ल्स हिच्या ए.एस.एस मार्केटिंगकडून ९० लाख व्याजाने घेतले होते. त्यावेळी सही केलेले कोरे लेटरहेड, स्टॅम्प पेपर आणि चेक दिले होते. कर्जाच्या बदल्यात मुद्दल, व्याज आणि दंड मिळून १ कोटी १३ लाख ५ हजार परत केल्यानंतरही ती अधिक पैशाची मागणी करत होती. मार्च २०२३ मध्ये ज्युली, तिचा मुलगा एलन आणि एकाने फिर्यादीच्या घरी जाऊन सव्वा कोटीची लाखांची मागणी केली. पैसे मुंबईतील गँगस्टर आण्णा आणि पंकज नारायण जाजूचे असल्याचे सांगत, ते परत केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी घरावर पाळत ठेवणे, तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणणे आणि खोटे गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीने त्रास दिला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी पूर्वीही विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखडे करत आहेत.