प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील महिला व युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत प्रतिजिल्हा ६४० प्रमाणे एकूण २३ हजार ४० उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत.अल्पसंख्याकच्या मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, पारशी, जैन व ज्यू या विविध समुदायातील होतकरू महिला व युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता १५ ते ४५ वयोगटातील महिला व युवकांकरिता कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. कौशल्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता एका अभ्यासक्रमाची सरासरी २५ हजार रुपये याप्रमाणे अंदाजित ५७ कोटी ६० लाख रुपये प्रशिक्षण शुल्क गृहीत धरण्यात आले आहे. उमेदवारांना प्रशिक्षण देण्याकरिता सात प्रशिक्षण संस्थांची निवडही करण्यात आलेली आहे. याकरिता स्वतंत्र वेब पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेंतर्गत १०० कोटी एवढा निधी अर्थसंकल्पित केलेला आहे. त्यातील १७ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता संस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.