प्रभात वृत्तसेवा पुणे – राखी पौर्णिमेला बहिण भावाला राखी बांधते. यामागे असतो तो बहिणीचा विश्वास आणि तिच्यासाठी जगाशी लढणाऱ्या भावाच्या प्रेमाचा धागा. मात्र, कधी कधी या अतूट नात्यावरही गैरसमजाचे ढग दाटतात. यातूनच मन हेलावून टाकणारे अंतर निर्माण होते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना न्यायालयीन प्रकरणामधून समोर आली आहे.आई-वडील नसल्याने भावाने बहिणीला आपल्याच लेकीसारखे मोठं केलं. तिच्या प्रत्येक लाडाची पूर्तता केली, शिक्षण दिलं आणि तिचं लग्नही मोठ्या थाटामाटात लावून दिलं. तिचं सुखच त्याचे समाधान होतं. काही वर्षांनी भावाचंही लग्न झालं. बहीण घराजवळच राहत असल्याने तिचं भावाकडे नेहमी येणं-जाणं सुरूच होतं. मात्र, बहिणीचा हाच स्नेह वहिनीला खटकू लागला. नणंद म्हणून होणाऱ्या तिच्या हस्तक्षेपामुळे आपला संसार बिघडतोय, असा तिचा समज झाला. वादविवाद वाढले आणि पत्नीने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. समुपदेशनादरम्यान पत्नीने नणंदेमुळे संसारात भांडणं होत असल्याचं स्पष्ट केलं. तेव्हा भावालाच सर्वस्व समजणाऱ्या बहिणीने स्वतःहून लिहून दिलं, मी भावाच्या घरी परत कधीच येणार नाही. त्या दिवसानंतर ती खरंच भावाच्या घरी कधीच आली नाही. भाऊ मात्र राखीपौर्णिमा आणि भाऊबीजेच्या दिवशी मोकळे मनगट पाहून कंतावत होता. बहिणीचे प्रेम मनातल्या मनात अनुभवत होता. अखेर एक दिवस वहिनीच्या मनात पश्चातापाची जाणीव झाली. तिने बहिणीची सगळी बाजू समजून घेतली आणि तिला परत घरी सन्मानाने आणलं. हे नातं तुटलं नव्हतंच, फक्त थोडं दुरावलं होतं “भाऊ-बहिणीचं नातं जगातलं सगळ्यात पवित्र नातं आहे. त्यासाठी काही वेळा त्याग करावा लागतो, पण तेच नातं अधिक खोल आणि विश्वासार्ह असते.” – ॲड. राणी कांबळे-सोनावणे, मध्यस्थ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण