प्रभात वृत्तसेवा पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला असताना, या प्रक्रियेत सत्ताधारी पक्ष, विशेषतः भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत निषेध नोंदवला.प्रभाग रचना आणि इतर प्रशासकीय बाबींत भाजपकडून राजकीय फायद्यासाठी हस्तक्षेप होत असून, काही प्रभागांचे राजकीय हित साधण्यासाठी नियोजन केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. शहरात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना उत्तेजन देण्यामध्ये भाजप सक्रीय असून, त्याला महापालिका आणि पोलीस प्रशासनातील काही घटकांचे सहकार्य लाभत असल्याचेही आरोप करण्यात आले.प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भाजपचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने वेळीच सुधारणा न केल्यास महाविकास आघाडी प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान देईल, असा इशारा आयुक्त राम यांना देण्यात आला. याशिवाय शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार बापू पठारे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, कमलताई व्यवहारे, वसंत मोरे, रवींद्र माळवदकर, सुनील माने, किशोर कांबळे, सुजित यादव, आसिफ शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.