नुसतीच वाजते रिंग, पिंपरी, कोल्हापूरचे फोन पुण्यात पुणे : शहरात आपत्तीच्या काळात नागरिकांकडून १०१ क्रमांकावर मदतीसाठी फोन केला जातो. मात्र, महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राच्या कार्यालयातील लॅन्डलाईन फोन अनेकदा नाॅट रिचेबल होत आहेत. अनेकदा वारंवार फोन करूनही केवळ रिंगचा आवाज येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या केंद्रासाठी बीएसएनएलने फोनची सुविधा दिली असून त्यासाठी चार स्वतंत्र लाईन आहेत. अनेकदा या लाईन वारंवार बंद पडत असल्याने अग्निशमनदलाचे अधिकारी आणि कर्मचारी वैतागले आहेत. १०१ क्रमांकावर फोन लागत नसल्याने महापालिकेने आता थेट खासगी मोबाईल कंपन्यांचे क्रमांक नागरिकांना देण्यास सुरूवात केली आहे. शहरातील केवळ आगीच्या घटनाच नाहीतर आपत्तीच्या कालावधीतही नागरीक १०० क्रमांक़ावर पोलीस, १०१ क्रमांकावर अग्निशमनदलाशी संपर्क साधतात. यावेळी तात्काळ प्रतिसाद दिला जातो. तसेच हे क्रमांक सहज लावता येतात. त्यामुळे नागरिक त्याला प्राधान्य देतात. महापालिकेच् मुख्य अग्निशमनकेंद्र भवानीपेठेत असून सर्व आपत्तीचे काॅल याच ठिकाणी जातात. येथे बीएसएनएलने चार जोड दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या केंद्राच्या फोनवर रिंगच वाजत नाही. त्याच वेळी नागरिकांना मात्र रिंग ऐकायला जाते. त्यामुळे,अग्निशमनदलाकडून फोनच उचलले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारीनंतर अग्निशमनदलाने वारंवार बीएसएनएलकडे पत्र व्यवहार केला असला तरी सुविधेत बदल घडलेला नाही. कॉलचा गोंधळ बीएसएनएलच्या गोंधळामुळे पिंपरी-चिंचवड, बारामती तसेच कोल्हापूरमधील अनेक फोन काॅल १०१ क्रमांकावर पुण्यात येत आहेत. पुण्याचे काॅल पिंपरीकडे जातात. काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगर परिसरात एका मेडीकल स्टोअरला आग लागली होती. यावेळी संबधितांना १०१ वर फोन केले. मात्र फोनच उचलले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या परिचयाच्या एका अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्याला फोन करत ही माहिती दिली. या कर्मचाऱ्यांने नंतर मुख्य केंद्रात दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर फोन करून आगीची माहिती कळविली.