प्रभात वृत्तसेवा पुणे – नागरिकांचे जमीन, मिळकतीबाबत वादाचे प्रसंग निर्माण होऊन त्यांना न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनाने नागरिकांसाठी प्रत्यय प्रणाली अर्थात अर्धन्यायिक प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध केली आहे. यामुळे नागरिकांना जमीनविषयक प्रकरणे ऑनलाइन दाखल करता येणार आहेत. शिवाय त्या प्रकरणांची सध्याची स्थिती. सुनावणी केव्हा आहे, याची माहितीही या प्रणालीमुळे समजणे सहजशक्य होणार आहे. राज्यात जमीन किंवा मिळकतीवरून नागरिकांमध्ये सर्वच स्तरावर वाद सुरू असतात. हे वाद कधी सामोपचाराने मिटतात, तर कधी एखादा वाद वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडलेला असतो. त्यामुळे पिढ्यानपिढ्या नागरिकांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात. अशीच अवस्था भूमिअभिलेख विभागात विविध स्तरावर सुरू असलेल्या जमिनीच्या दाव्यांबाबत होत असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रत्यय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.