प्रभात वृत्तसेवा पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोघांची ५७ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध नांदेड सिटी आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सिंहगड रस्ता भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ लाख ६७ हजारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार हे सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ३६ लाख ६७ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला त्यांना परतावा मिळाल्याचे भासवले. परतावा, तसेच मूळ रक्कम परत न केल्याने तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करत आहेत.हडपसर परिसरातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २३ लाख ६५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत.