प्रभात वृत्तसेवा पुणे – कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावरील हिट अँड रन प्रकरणात कोठडीत असलेल्या कारचालकाने जामीन मिळवा यासाठी वेगवेगळ्या न्यायालयांत एकापाठोपाठ एक असे तब्बल आठ अर्ज केले. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग करत न्यायालयांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याला एक लाखाचा दंडही सुनावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा आदेश दिला.आरोपीने न्यायालयाची खोटेपणाने दिशाभूल केली आहे, माहिती लपविण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यामुळे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर झाला असून, न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला. तसेच जनतेचा निधी असलेल्या सरकारी तिजोरीवरही ताण आला, अशी गंभीर निरीक्षणे नोंदवित न्यायालयाने आरोपीला धडा शिकविण्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. आरोपीने दंडाची रक्कम १५ दिवसांत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.आयुष प्रदीप तायाल (वय ३४, रा. मगरपट्टा सिटी) असे आरोपीचे नाव आहे. दारूच्या नशेत ऑडी भरधाव चालवून डिलिव्हरी बॉयच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध मुंढवा पोलिसात गुन्हा दाखल आहे. ही घटना ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्री दीडला कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर घडली. या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयीन कोठडी झाल्यावर आयुषने २१ ऑक्टोबर २०२४ रोजी एकाच वेळी वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, पुणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केले. हे अर्ज न्यायालयांनी फेटाळले. याशिवाय त्याने उच्च न्यायालयातही जामीनासाठी दोन वेळा केलेले अर्ज मागे घेतले. त्यानंतर आठव्यांदा जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. त्याला सरकारी वकील जावेद खान यांनी विरोध केला. सीसीटीव्ही चित्रीकरण आणि न्यायवैद्यक पुराव्यांनुसार, आरोपी मद्याच्या नशेत होता. अपघातानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्याऐवजी तो पळून गेला. त्याच्याविरोधात तीन साक्षीदारांनी साक्ष दिली असून, गाडीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न होतो, असा युक्तिवाद सरकारी वकील जावेद खान यांनी केला. हा युक्तीवाद ग्राहय धरत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.