प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी केवळ ९ गावांना सध्या पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित गावांना पाणी देण्यासाठी पालिका २०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार आहे. खडकवासला धरणाजवळील केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या चार हेक्टर जागेत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.हा प्रकल्प आधी पाटबंधारे विभागाच्या जागेत उभारला जाणार हता. संरक्षण आणि पाटबंधारे विभागातील वादामुळे ती जागा मिळू शकली नाही. त्यामुळे पालिकेने केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेकडे जागेची मागणी केली. त्याला संबधित संस्थेने तत्त्वतः संमती दिल्याचे प्रशासनाने सांगितले. एकूण ८०१ कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून, दोन टप्प्यांत राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी ५१० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. पहिल्या टप्प्यात नदीकाठच्या भागांसह एकूण १४ गावांना तसेच दुसऱ्या टप्पानंतर उर्वरित ९ गावांनाही शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जलवाहिनी टाकणे आणि आवश्यक भूसंपादनाची कामे होणार आहेत. सध्या या गावांमध्ये टँकरद्वारे किंवा रॉ-वॉटरच्या मार्गाने पाणी दिले जाते. शासनाने पालिकेला पाणीपुरवठा प्रकल्प सादर करण्याच्या सूचना दिल्यानंतर हा आराखडा तयार केला. नुकताच प्राथमिक आराखडा अतिरिक्त आयुक्त एम. पी. जे. प्रदीप चंद्रन यांना सादर केला असून लवकरच प्रत्यक्ष जागेची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाईल असे पालिकेतून सांगण्यात आले.