कात्रज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सोमवारी (दि. 20) रात्री 10:30च्या सुमारास कात्रज मुख्य चौकात थांबून परिसरातील समस्या थोडक्यात जाणून घेतल्या. “कात्रज विकास आघाडी’चे नमेश बाबर, अमृता बाबर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांशी शिंदे यांनी चर्चा करीत सर्व प्रश्न सोडविण्याकामी संबंधीत विभागांना सूचना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. कात्रज चौकात मुख्यमंत्री शिंदे हे बाबर यांच्याशी चर्चेसाठी थांबल्याने आगामी काळातील राजकीय टार्गेटची चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे आणि नमेश बाबर यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण
कात्रज परिसरातील प्रश्नांबाबत “कात्रज विकास आघाडी’ने 11 फेब्रुवारीला धिक्कार आंदोलन करीत आवाज उठवला होता. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेत फोनद्वारे संपर्क साधत कात्रज व 23 गावांतील प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच भेटू असा शब्द बाबर यांना दिला होता, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वेळ काढत बाबर आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी कात्रज विकास आघाडी यांच्यामार्फत नमेश बाबर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी माजी उपसरपंच अनिल कोंढरे, माजी सरपंच गणपत गुजर, दीपक गुजर, गणेश मोहिते, गोरक्ष मांगडे, माजी नगरसेविका अमृता बाबर, निलेश धनवडे, विक्रम भिलारे, स्वराज बाबर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कात्रज मध्ये मुख्यमंत्री पहिल्यांदाच आले, त्यांनी समस्या जाणून घेतल्या असून पोटनिवडणुकीनंतर त्या सोडविल्या जातील असे आश्वासन दिले ओह. प्रचाराच्या धामधुमीतही त्यांनी कात्रजकरांना दिलेला शब्द पाळला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कात्रजकरांनी “कात्रज विकास आघाडी’च्या माध्यमातून दाखविलेल्या एकजुटीतून कामे मार्गी लागतील, असा विश्वास वाटतो.
– नमेश बाबर, प्रमुख, “कात्रज विकास आघाडी’
मुख्यमंत्र्यांनी कात्रजचे महत्त्व ओळखले
तीन आमदार, दोन खासदारांचा मतदार संघ असताना कात्रजच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. आता, मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे दमदार सुरुवात करीत कात्रजचे महत्त्व ओळखले आहे. कात्रज परिसरात अनेक राजकीय बदल घडतील, असा दावा त्यांच्या भेटीनंतर केला जात आहे. खडकवासला विधानसभा, पुरंदर विधानसभा, हडपसर विधानसभा, बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा मतदार संघाच्या काठावर असलेल्या कात्रजकरांच्या मतांची किंमत लवकरच कळणार आहे.