Pune : जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष

पुणे : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. मानसिंग साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या निर्देशानुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे वैद्यकीय उपचारांसाठी नागरिकांना अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांचा वेळ व पैसा याची बचत व्हावी, या हेतूने मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणांची माहिती जिल्ह्यात उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्याचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील समाजातील गरीब, गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळवून देणे, तसेच विविध आरोग्य योजनांविषयी माहिती देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा आहे.
ज्या रुग्णंना कोणत्याही शासकीय योजनेत समाविष्ट होता येत नाही, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचा निर्धार या कक्षाच्या माध्यमातून केला जाणार आहे.





