पुणे – पुणे बाजार समितीतर्फे मार्केट यार्डात आडतदारांची दप्तर तपासणी सुरू आहे. फळे-भाजीपाला विभागात एकाची दप्तर तपासणी पूर्ण झाली असून, आणखी दोघांना दप्तर हजर करण्याची नोटीस दिली आहे. भुसार विभागात सहा आडत्यांना दप्तर हजर करण्याची नोटीस दिली आहे. मात्र, ही तपासणी अधिकाऱ्यांतील खुन्नसमधून सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. सध्या भुसार विभागातील विभागप्रमुख पूर्वी फळ-भाजीपाला विभागात प्रमुख होते. फळ-भाजीपाला विभागात प्रमुख बनलेले पूर्वी भुसार विभागात अधिकारी होते. त्यामुळे एकामेकांची उणी-धुणी काढण्यासाठी ही दप्तर तपासणी सुरू आहे. ही तपासणी म्हणजे अधिकाऱ्यांतील खुन्नस असल्याची चर्चा बाजार घटकात रंगली आहे. याचा फटका आगामी काळात दोन्ही विभागातील आडत्यांना बसणार आहे. त्यांना तपासणीसाठी दप्तर हजर करण्यास कधीही सांगितले जाऊ शकते. फळे-भाजीपाला विभागात तपासणी पूर्ण झालेल्या एका आडत्याकडे ६ लाखाहून अधिक फरक निघाला आहे. हा फरक जीएसटीसह भरून घेण्यात येणार आहे. आता दोन्ही विभागात मिळून आणखी आठजणांना नोटीस दिली आहे. त्यांनी तपासणीसाठी दप्तर हजर केल्यानंतर त्यात फरक निघणार की नाही, हे कळणार आहे. मात्र, तुर्तास ही दप्तर तपासणी अधिकाऱ्यातील खुन्नस असल्याची बाजारात चर्चा सुरू आहे. बाजार समितीकडून प्रक्रियेनुसार नियमित दप्तर तपासणी सुरू आहे. यामध्ये अधिकाऱ्यांतील खुन्नस वगैरे असा काही भाग नाही. – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती बाजार समितीची दप्तर तपासणी सेस वाढीसाठी आहे का हप्तेवाढीसाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे. ठराविक आडत्यांची दप्तर तपासणी करण्यापेक्षा सरसकट सर्वांची तपासणी करावी. – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते.