पुणे : खड्डे, खचलेले चेंबर तसेच अडथळ्यांमुळे शहरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले असतानाच महापालिकेच्या पथ विभागाचा आणखी एक अनागोंदी कारभार समोर आला आहे. पथ विभाग तसेच ड्रेनेज विभागाच्या कामानंतर खचलेले आणि वरखाली झालेले चेंबर रस्त्यांच्या पातळीत आणण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबविली.
त्यानंतर आता प्रमुख १५ रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. त्यात अवघ्या महिनाभरापूर्वी वर उचललेले अनेक चेंबर पुन्हा खाली गेले आहेत. आता पुन्हा तेच चेंबर समपातळीवर आणणे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पथ विभागाच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीत नसल्याने वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. चेंबरमुळे होणार्या खड्ड्यांमुळे अपघात होतात, तसेच पाठदुखी, कंबरदुखीचाही सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाने ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीत आणण्याची मोहीम सुरू केली. यात विविध रस्त्यांवरील सुमारे ४०७ चेंबर्स उचलण्यात आले.
याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदारांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रकल्पांची आढावा बैठक पालिकेत घेण्यात आली. यात अतिक्रमणांवर कारवाईसह ३० जानेवारीपर्यंत शहरातील प्रमुख १५ रस्ते पूर्णपणे रिसर्फेसिंग करण्यासोबत खड्डे दुरुस्तीच्याही सूचना करण्यात आल्या. त्यानंतर महापालिकेने “मिशन १५’ अंतर्गत शहरातील प्रमुख १५ रस्त्यांच्या डांबरीकरणासह अन्य उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता.
महापालिकेच्या पथ विभागाने पुनर्डांबरीकरणासाठी प्रमुख १५ रस्ते खरवडून त्यावर डांबरीकरण सुरू केले. या वेळी चेंबरची झाकणे डांबरीकरणात गेल्याने ती पुन्हा वर उचलावी लागणार आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला आहे.