Pune : बाजार समितीत नोंदीची अनागोंदी

पुणे : पुणे बाजार समितीचे उत्पन्न दरवर्षी वाढत आहे, तरीही दरवर्षी कोट्यवधींची सेस गळती होत आहे. कुंपनच माल खात असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीच्या तपासणी अहवालात काही ठराविक शेतमालाची विक्री होऊनही त्याची नोंदच नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून, संचालक मंडळ आता दोषींवर कारवाई करणार का, हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.
मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा बटाटा, केळी, गूळ भुसार बाजारात दाखल होणार्या विविध प्रकारच्या शेतमालाची आवक नोंद केली जाते. त्यानुसार होणाऱ्या विक्रीवर बाजार फी (सेस) आकारणी होते. मात्र, आजपर्यंत कोणत्याही विभागात १०० टक्के आवक नोंद होत नाही. तोलणार, समितीची आवक आणि स्टर्लिंग सिस्टीम या संगणक प्रणालीमधील आवकमध्ये तफावत आहे. त्यामुळे बाजार फी व देखरेख खर्च रकमेतही मोठे नुकसान होत आहे.
बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यानंतर पहिल्याच वर्षी बाजार समितीच्या सेसच्या (बाजार फी) उत्पन्नात तब्बल १६ कोटींनी वाढ झाली आहे. शेतमाल उलाढालीवर सेसचे उत्पन्न अवलंबून आहे. मात्र, संचालक मंडळ नियुक्ती झाल्यानंतरही सेस चुकवेगिरी आणि सेसचोरी थांबविण्यासाठी शंभर टक्के यश आलेले नाही. भुसार बाजार, फळे भाजीपाला, केळी, फुलबाजारमध्ये आजही शेतमालाची आवक होऊन त्याची विक्री होते; पण या व्यवहारावरील सेस चुकवला जात आहे. बाजार समितीने केलेल्या पाहणीत काही शेतमालाची आवक आणि सेस चोरी बाजार समितीच्या निदर्शनात आली आहे. त्यामुळे आता बाजार समिती यावर काय कारवाई करणार, याची उत्सुकता आहे.
विभागप्रमुखांवर कारवाई?
बाजारात शेतीमालनिहाय म्हणजे फळे, भाजीपाला, कांदा बटाटा, केळी, गूळ भुसार असे विभाग आहेत. प्रत्येक विभागात दाखल होणार्या शेतमालाची आवक नोंद होते. आपल्या विभागात येणाऱ्या सर्व शेतमालाची नोंद करणे, शेतमाल विक्री व्यवहारावरील सेस जमा करणे, या जबाबदाऱ्या विभागप्रमुखांच्या आहेत. मात्र, अनेक विभागप्रमुख संचालक मंडळाच्या काळात कारवाई होणार नाही, या आविर्भावात आहेत; परंतु संचालक मंडळाने आता थेट विभागप्रमुखांवर कारवाईची भूमिका घेतल्याने ते अडचणीत सापडणार आहेत.
सेस चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. बाजारात काही ठराविक शेतमालाची वाहने नोंद न करता परस्पर व्यापारी त्या शेतमालाची विक्री करून सेस बुडवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाले आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यापारी, आडते, अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जाईल.
– दिलीप काळभोर, सभापती, बाजार समिती, पुणे





