Pune : मेट्रो मार्गाच्या उद्घाटनामुळे आज वाहतूक मार्गांत बदल

पुणे -जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो लाइनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी आॅनलाइन होणार आहे. कार्यक्रमाला वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने स्वारगेट, शिवाजीनगर परिसरांतील काही मार्गांवरील रस्त्यावर सकाळी ७ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार वाहतुकीत तसेच पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र आणि स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसर जेधे चौक ते बजाज पुतळा रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी ७ वाजल्यापासून नो पार्किंग करण्यात येत आहे. तर जेधे चौक ते बजाज पुतळा चौक दरम्यान आवश्यकते नुसार सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
जेधे चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी जेधे चौकातून सातारा रोडने व्होल्गा चौकात जावे. तसेच उजवीकडे वळण घेऊन मित्र मंडळ चौकातून उजवीकडे वळण घेऊन सावरकर पुतळा चौक येथून इच्छित स्थळी जावे. तसेच सातारा रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनचालंकाना जेधे चौक उड्डाण पुल सोलापुर रस्त्याकडे जाण्यासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक व तोफखाना चौक ते रानडे पथ या दोन्ही रस्त्यावर सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यत सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. तर छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक हा मार्ग अत्यावश्यक वेळी दुहेरी वाहतुक सुरु करण्यात येईल.





