Pune: मार्केट यार्डात चेंबरची झाकणे गायब; पावसामुळे रस्त्यावर पाणी

पुणे – भुसार बाजाराजवळील मुख्य नेहरू रस्त्यावरील आठ ते दहा चेंबर उघडी आहेत. काही चेंबर तुंबलेल्या अवस्थेत असून त्यावरून जड वाहने गेल्यास चेंबर खचून वाहन उलटू शकते, प्रसंगी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. भुसार बाजारात मार्केट यार्डात माल वाहतूक करणाऱ्या जड वाहनाची वर्दळ पाहता, अशा अपघाताचा धोका अधिक असल्याने याबाबत माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
अवकाळी पावसातच पालिकेच्या कामाची पोल खोल झाली असून चेंबरची कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
मार्केट यार्ड भुसार बाजारात देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो गाड्या माल घेऊन येत असतात, शहरातील बहुतांश व्यापाारी, नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात.
त्यामुळे कित्येक दिवसांपासून उघड्या असलेल्या चेंबरची दुरूस्ती होणे गरजेचे असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सध्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे उघड्या चेंबरमध्ये वाहने अडकण्यासह दुचाकीस्वर पडून गंभीर अपघाताचा धोका असून चेंबरमध्ये एखादी व्यक्ती पडल्यास ती वाहून जावू शकते, महापालिकेने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
“महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात वारंवार सांगूनही पालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण दिले जाते. अत्यावश्यक कारणांसाठीसुद्धा पालिका प्रशासन गंभीर नाही. हेच यावरून स्पष्ट दिसते. हे दुर्देव आहे.” – प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक, भाजप





