Pune: दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीच्या वतीने आयोजित “शिवचरित्र प्रसार अश्वमोहिमेचा” शुभेच्छा समारंभ गुरुवारी (दि. १६ एप्रिल २०२६) सायंकाळी शिवसृष्टी, कात्रज-आंबेगाव येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास माजी आमदार दीपक राव पायगुडे, उद्योजक व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम, तसेच विनीत कुबेर, सुधीर थोरात, सागर देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. दि. १७ एप्रिल ते १० मे या कालावधीत महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांवरून ही अश्वमोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी शिवचरित्र कथाकथन, व्याख्याने, तसेच शाहीरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व किल्ल्यांवरून पाणी आणून ते रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर मोहिमेची सांगता होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर हेमंत मावळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून केली. यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि ऐतिहासिकतेचे वातावरण निर्माण झाले. जगदीश कदम यांनी मनोगतात सांगितले की, “२००५ पासून मी या संस्थेशी जोडलेलो असून अश्वारोहणापासून सुरू झालेल्या या उपक्रमाने विविध स्पर्धा व मोहिमांद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे. शिवसृष्टी प्रकल्पासाठीही संस्थेचे योगदान मोलाचे आहे.” तसेच या मोहिमेद्वारे रोटरी पब्लिक इमेज कमिटीने जनसंपर्क वाढविण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणेश पुरंदरे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. अजित आपटे यांनी केले. यावेळी मोहिमेत सहभागी होणाऱ्या शिलेदारांचा तसेच २५ किल्ल्यांवरून पाणी आणणाऱ्या मावळ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व घोडेस्वारांना झेंडा दाखवून अश्वमोहिमेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला, अशी माहिती रोटरी पब्लिक इमेज कमिटी सहसंचालक महेश घोरपडे यांनी दिली.