Pune : मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणाला केंद्राची मान्यता

पुणे– पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला म्हणजेच वनाझ ते रामवाडी मार्गिकेच्या (मार्गिका-१) प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता दिली. त्यानुसार आता वनाझ ते रामवाडी मार्गाचा वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली असा विस्तार होणार आहे.
या दोन्ही मार्गांसाठी ३,६२४ .२४ कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. केंद्रशासन, राज्यशासन, खासगी सहभागातून हा विस्तारीत मार्ग विकसित केला जाणार आहे. हा नवीन विस्तारीत मार्ग १२.७५ कि.मी असणार आहे. महामेट्रोकडून या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गावर मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर या दोन्ही मर्गाचा विस्तार करण्याचा आराखडा सादर करण्यात आला.
या विस्तारामुळे आता चांदणी चौक ते वाघोली पर्यंत थेट मेट्रोची सेवा मिळणार आहे. तर या पूर्वीच स्वारगेट ते कात्रज मार्गास मंजूरी दिल्याने कात्रज पासून ते थेट निगडी पर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. या मार्गाचे काम पूर्ण होण्यास चार वर्षे लागणार आहेत. सध्या मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ७० हजारांपर्यंत पोहचली आहे.
असा आहे विस्तारीत मार्ग
रामवाडी ते वाघोली (मार्गिका २ब) : या मार्गावर ११ स्थानके (विमान नगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळे नगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी) असतील आणि त्याची लांबी ११.६३ किमी असेल. या विस्ताराने वाघोली आणि विठ्ठलवाडी हा भाग मेट्रोने उर्वरित शहराला जोडला जाणार आहे.
वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) : या विस्तारित मार्गावर २ स्थानके (कोथरूड बस डेपो, चांदणी चौक) असून, त्याची लांबी १.२ किमी असणार आहे. यामुळे वनाज ते चांदणी चौक परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होईल. हा मार्ग पुणे- बेंगलोर महामार्गाच्या लगत असल्याने मुंबई तसेच साताऱ्याच्या बाजूने शहरात आलेल्या प्रवाशांना शहराच्या कोणत्याही भागात सहज जाणे सोपे होणार आहे.
या दोन्ही मार्गिकांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणावर विस्तारित पूर्व व पश्चिम भाग मेट्रोने उर्वरित शहराशी जोडला जाणार आहे. या भागातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. – श्रावण हर्डीकर (व्यवस्थापकीय संचालक ,महामेट्रो)



