Pune Census – राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यातील घरोघरी जाऊन कुटुंब नोंदणीच्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या हद्दीतील १० टक्के घरांची नोंदणी झाली आहे. १५ जूनपर्यंत घर नोंदणीची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जनगणना विभागाचे प्रमुख विजय लांडगे यांनी दिली. यावर्षी राष्ट्रीय जनगणना सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात मोबाइल ऍपद्वारे स्वगणना उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यात एक लाख ७३ हजार नागरिकांनी कुटुंबांची नोंदणी केली आहे. यामध्ये पुणे महापालिका हद्दीतील सुमारे ५० टक्के लोकांचा सहभाग राहिला आहे. दुसऱ्या टप्पात १५ मे पासून घरोघरी जाऊन कुटुंब नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी तब्बल १२ हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक प्रगणकाला ८०० घरांमध्ये पोहोचून प्राथमिक माहिती घेऊन घरांना क्रमांक द्यायचे आहेत. पुणे शहरात मिळकत कर विभागाकडील आकडेवारी नुसार सुमारे १४ लाख मिळकती आहेत. यामधून व्यावसायिक मिळकती वगळता अनधिकृत घरे, तसेच वसाहतीत राहणार्या कुटुंबांची संख्याही मोठी आहे. १५ मे पासून या मोहिमेला सुरुवात झाली असून, पाच दिवसांत १० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण केल्याचे लांडगे यांनी सांगितले. दरम्यान, प्रगणकांना जनगणनेचे प्रशिक्षण दिल्यानंतर आवश्यक ते साहित्य आणि ओळखपत्रही उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, काहींना ओळखपत्र मिळालेली नाहीत, प्रगणनेची ऑर्डर मिळालेली नाही, अर्धवट साहित्य मिळाले आहे, अशा तक्रारी काही भागातील प्रगणकांकडून आल्या आहेत. त्या तातडीने सोडवण्यात येत असल्याचे लांडगे यांनी सांगितले. प्रगणकांची नोंदणी करताना आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांकडेही जनगणनेचे काम सोपविल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी बदल केल्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले.