पुणे -शहरातील पथदिवे, पदपथ, पीएमपीचे बसथांबे, सार्वजनिक भिंती, स्वच्छतागृहे एवढेच काय तर झाडांना खिळे मारून आणि जागा मिळेल तिथे भित्तीपत्रके चिटकवून शहर विद्रुप करणाऱ्यांवर आता महापालिकेकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून अशी भित्तीपत्रके लावणाऱ्या दहा व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, आणखी नऊ जणांविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. आतापर्यंत महापालिका केवळ अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. तर क्वचितच एका राजकीय नेत्यावर शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. मात्र, आता “जी-20′ परिषदेच्या निमित्ताने आयुक्तांनी शहर स्वच्छ ठेवण्यासह अशा प्रकारे शहर विद्रुप करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले असून, त्याची सुरुवात कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने सुरू केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अस्थापना आहेत. त्यांची जाहिरात करण्यासाठी अनेक व्यावसायिक भित्तीपत्रकाचा वापर करतात. ही भित्तीपत्रके सार्वजनिक ठिकाणी महापालिकेने केलेल्या रंगरंगोटीवर अथवा नागरिकांसाठी असलेल्या सूचना फलकांवर लावली जातात, त्यात, प्रामुख्याने बस थांबे, पथदिवे, स्वच्छतागृहे, सार्वजनिक भिंती, महापालिकेच्या मिळकती,तर शहरातील ऐतिहासिक वास्तूंवरही ही पत्रके राजरोसपणे चिटकविली जातात. त्यातच, महापालिकेकडून शहरात सध्या शहर स्वच्छ करण्यात येत असून सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी केली जात आहे. मात्र, लगेचच या कामावरही अशी भित्तीपत्रके चिटकविण्यात आली आहे. त्याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी अशा जाहीरातदारांवर थेट शहर विद्रूपीकरणाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून महापालिकेने पोलिसांनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी कारवाई सुरू केली आहे. या भित्तीपत्रकांवरील कंपनीचे नाव आणि मोबाइल क्रमांकाच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांच्या आहेत जाहिराती खासगी क्लासेस, स्पर्धा परीक्षा क्लासेस, डबेवाले, सोने तारण, घरगुती व्यावसायिक, वैद्यकीय उपचार, कर्ज मिळवून देणे, घरबसल्या नोकरी, दुर्धर आजारावरील उपचार, सलून, ब्यूटी पार्लर, भविष्यवाले, मालमत्ता खरेदी-विक्री, वाहन दुरुस्ती, भंगारवाले, नोकरीविषयक अशा भित्तीपत्रकांची शहरात भरमार आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे, आतापर्यंत कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून 9 जणांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अस्थापना असल्याने त्यांनाही नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. – आशिष महाडदळकर, महापालिका सहाय्यक आयुक्त