Pune : पोलीस निरीक्षकासह १६ जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : वाघोलीतील दहा एकर जमीन बळकावण्याच्या प्रकरणात चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा वाघोली ठाण्यात दाखल झाला आहे. यात लांडगे यांच्यासह १६ जणांचा समावेश असून चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
या प्रकरणी अपर्णा यशपाल वर्मा ( ५८, रा. अंधेरी, मुंबई) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यापूर्वी चंदननगर पोलीस ठाण्यात लांडगे आणि इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अपर्णा वर्मा यांच्या जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रांची तयार केली, दुसऱ्या महिलेला अपर्णा वर्मा म्हणून उभे करून बनावट खरेदीखत तयार केले. लांडगे यांनी बनावट दस्त खरेदीखत तयार करून ती खरी मालमत्ता खरेदीप्रक्रिया असल्याचे भासवले. हे खरेदीखत सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात नोयल जोसेफ दास, नोअल जोसेफ दास, ज्योती नोयल दास, राहुल नोयल दास, रोशनी नोयल दास, जॉक्सन नोयल दास, रोहित जॉक्सन दास, गिरीश कामठे, हेमंत कामठे, संतोष शेट्टी, अदित्य घावरे, अमोल भूमकर, राजेंद्र लांडगे, रामेश्वर मस्के, सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि दस्त नोंदणी निबंधक यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २०२४ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत घडली.
चार अपर्णा वर्मांचा दावा
या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता तो आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. वाघोलीतील १० एकर जमिनीच्या मालकीसाठी चार अपर्णा वर्मा समोर आल्या होत्या. त्यांनी आपापल्या नावाने जागेवर दावा केला होता. मात्र, मूळ अपर्णा वर्मा (सध्या मुंबईत, मूळ दुबईमध्ये) या महिलेकडून राजेंद्र लांडगे आणि त्यांच्या साथीदारांनी सुमारे साडेसहा कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, आरोपी नोयल जोसेफ दास आणि त्यांच्या साथीदारांनी ही जमीन १९९१ मध्ये खरेदी केल्याचा दावा करत बनावट खरेदीखत तयार केले. परदेशात असल्यामुळे सातबाऱ्यावर नाव नोंदवता न आल्याचे त्यांनी सांगितले. हे खरेदीखत खरे असल्याचे भासवून जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला.
तीन अपर्णा वर्मा ठरल्या बनावट
या चार अपर्णा वर्मांपैकी तिघीजणी नगर, इस्लामपूर आणि राजस्थान येथील असून त्या बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी न्यायालयात दाखल केलेले दावेही मागे घेतले आहेत. मूळ अपर्णा वर्मा या पुण्यात राहून जमीन खरेदी करून दुबईला गेल्या असून सध्या त्या मुंबईत वास्तव्यास आहेत. आतापर्यंतच्या तपासानुसार त्यांचाच या जमिनीवर खरा हक्क असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली.





