पुणे कॅन्टोन्मेंट: वाढला टक्का; कोणाला धक्का ?

पुणे – “मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात या वर्षी मतदान ९ ते १० टक्के वाढले आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात अवघे ४३ टक्के मतदान झाले होते. यंदा तब्बल ५२.८५ टक्के मतदान झाले आहे. या वाढीव मतदानाचा धक्का कोणाला बसणार आणि कोण विजयी मिरवणूक काढणार, याकडे लक्ष लागले आहे. तर, काही केंद्रावर वादावादीच्या किरकोळ घटना घडल्या.
या मतदारसंघात पाच केंद्रांवर सकाळी मशिनमध्ये बिघाड झाल्याचे माॅकपाॅलवेळी दिसून आले. त्यानंतर मशिन बदलण्यात आल्या आणि मतदान सुरळीत सुरू झाले. सकाळी ७ ते ९ दरम्यान ५.५३ टक्के मतदान झाले. ९ नंतर भवानीपेठ, काशेवाडी, ताडिवाला रस्ता, वानवडी, कॅम्प, घोरपडी भागांतील मतदान केंद्रांवर गर्दी होऊ लागली. त्यामुळे सकाळी ११ पर्यंत १४.२ टक्के मतदान झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.
प्रामुख्याने काशेवाडीतील जनरल अरूण कुमार वैद्य स्टेडियमसह, ताडिवाला रस्ता येथील रेल्वे क्वाॅर्टर्स तसेच महात्मा जोतिबा फुले शाळेचा समावेश होता. कॅम्प परिसरातील केंद्रांवरही असेच चित्र होते. दुपारी १ पर्यंत २५.५० टक्के मतदान झाले. तर ३ वाजता ३५.८४ टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतर मतदारांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्याने पाच वाजे पर्यंत सुमारे ४७.८३ टक्के मतदान झाले होते. तर एकूण मतदान ५२ टक्के झाले.
कुटुंबेच पडली एकत्र बाहेर
या मतदारसंघात सर्वच केंद्रांवर एकाच वेळी संपूर्ण कुटुंबेच मतदानासाठी बाहेर पडत असल्याने गर्दी दिसून आली. परिणामी, पोलिसांची कसरत झाली. काही ठिकाणी ओळखपत्र आणि मतदारयादीतील छायाचित्रात बदल असल्याने अनेकांच्या ओळखपत्रावर आक्षेप घेण्यात आला. बहुतांश लोकांनी दुसरे ओळखपतत्र आणले नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. त्यांनी दुसरे ओळखपत्र घेऊन येत मतदानाचा हक्क बजावला.
वर्ष आणि मतदानाची टक्केवारी
२००९ – ३५.९३
२०१४-४७.२२
२०१९- ४३.४
२०२४ – ५२





