Pune Bypoll Election Results 2023 : मतमोजणीनिमित्त कोरेगाव पार्कमध्ये वाहतूकीत बदल

पुणे – कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. 2) कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. आजपासून ( दि. 1 मार्च) दुसऱ्या दिवशी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
कोरेगाव पार्क भागातील सेंट मीरा कॉलेज आणि अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना गल्ली क्रमांक एकपर्यंत प्रवेश देण्यात येईल. गल्ली क्रमांक एक येथून वाहनचालकांनी डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून बॅरिकेड्स उभे करण्यात येणार आहेत. साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक पाच, सहा आणि सातकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना गल्ली क्रमांक चारपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. गल्ली क्रमांक चार येथून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
आवश्यकतेनुसार सेंट मीरा कॉलेजसमोर, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यासमोर आणि साऊथ मेन रस्त्यावर गल्ली क्रमांक पाच येथे लोखंडी कठडे उभे करण्यात येतील. साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक दोन येथे जैन प्रॉपर्टीसमोर लोखंडी कठडे उभे करण्यात येणार असून, तेथून सर्व वाहनांना साऊथ मेन रस्त्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/sanjay-raut-will-go-to-court-against-bjp-leader-kirit-somaiya-in-the-ins-vikrant-scam-case/
सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ मेन रस्त्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. दरोडे पथ (कोरेगाव पार्क पोलीस ठाणे) ते गल्ली क्रमांक पाच साऊथ मेन रस्त्यावर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.



