Pune News : पुण्यातील सॅलिसबरी पार्क परिसरातील ६१ वर्षीय उद्योगपतीचा मृतदेह शनिवारी दुपारी डेक्कन परिसरातील आपटे रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित उद्योगपती शुक्रवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी संपर्क होत नसल्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. (Pune News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी हॉटेल कर्मचाऱ्यांनी डेक्कन जिमखाना पोलिसांशी संपर्क साधत एका ग्राहकाने शुक्रवारी हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडल्यानंतर संबंधित उद्योगपती मृतावस्थेत आढळले. (Pune News) डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी सांगितले की, हॉटेलच्या खोलीत विविध ठिकाणी उलटी झाल्याचे दिसून आले. प्राथमिक तपासात त्यांनी विष प्राशन केल्याचा संशय आहे. (Pune News) परिस्थितीवरून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांना खोलीतून एक चिठ्ठीही सापडली असून ती उद्योगपतींनी लिहिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Pune News) या चिठ्ठीत काही आर्थिक अडचणींचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, नातेवाईकांच्या मदतीने या चिठ्ठीची सविस्तर पडताळणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे व्यावसायिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिस पुढील तपास करत आहेत. (Pune News)