PUNE: विजयस्तंभ स्थळी पीएमपीची बससेवा

पुणे – भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी २०२४ या दिवशी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) वेगवेगळ्या भागातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. लोणीकंद, तुळापूर रोड, चाकण रोड या ठिकाणांहून पीएमपीच्या बसची मोफत सेवा असणार आहे.
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ३१ डिसेंबर व एक जानेवारी २०२४ रोजी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. पुण्यातून मनपा, पुणे स्टेशन, पिंपरी, दापोडी येथून खराडी चौकापर्यंत जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बसला प्रवाशांना तिकीट द्यावे लागणार आहे. त्यासाठी साधणार मनपा येथून एकूण १००, पुणे स्टेशन येथून ३३ बस सुटतील. तर, पिंपरी येथून तीन आणि दापोडी येथून दोन अशा जादा बस सोडण्यात येणार आहेत. तसेच, गर्दीनुसार आणखी बसचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.
येथून पुढे असेल मोफत बस सेवा
विजयस्तंभाच्या चारही बाजूने येणाऱ्या वाहनांना लोणीकंद, तुळापूर रोड, चाकण आणि शिक्रापुर रोडवर येथून बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे बंद केलेल्या रस्त्यापासून विजयस्तंभाकडे जाण्यासाठी पीएमपीकडून स्वतंत्र बससेवा सुरू असून, ही सेवा मोफत असणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील कुस्ती मैदान, खंडोबा माळ, तुळापूर रोडवरील सैनिकी शाळा , चिंचवण हाॅटेल/वाय जंक्शन येथून पुढे विजयस्तंभापर्यंत मोफत बससेवा आहे. तर शिक्रापुर पोलीस ठाणे हद्दीत जीत पार्किंग, वक्फ बोर्ड, चाकण रोडवरील जाधव पार्किंग, तोरणा हाॅटेल शिक्रापूर पार्किंग आणि वढू पार्किंग इनामदार हाॅस्पिटल येथून विजयस्तंभापर्यंत मोफत बससेवा असणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.




