पुणे – लग्न झाल्यापासून वेगळे राहण्यासाठी आणि बाहेर नोकरी करण्याच्या कारणावरुन पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने मोबाइलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये “मी माझे जीवाचे बरेवाईट करत असून त्यास माझी पत्नी व सासू जबाबदार आहे,’ असे म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार (रा. माई हाइट्स, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना 10 ऑगस्ट रोजी घडली होती.
याप्रकरणी त्याचे वडीत सुनील पवार यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरुन रोहितची पत्नी आणि सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित आणि रश्मी यांना एक मुलगाही आहे.
रोहित याचा कन्स्ट्रक्शनचा छोटा व्यवसाय होता. मागील काही महिन्यांपासून त्याला काम मिळत नव्हते. यामुळे त्याने पत्नीमार्फत सासूकडून घरखर्चासाठी पैसे घेतले होते. यातूनच पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.