महाविकास आघाडीद्वारेच निवडणुका लढविणार-प्रशांत जगताप पुणे – पुणे महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. पुण्यासह राज्यातही महाविकास आघाडीतून निवडणुका लढविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. यामुळे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पूर्ण विरामच मिळाला आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीही लढविल्या. त्यानंतर पुणे महानगरपालिका निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी तीव्र विरोध दर्शवला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर पदाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. प्रशांत जगताप यांनी शनिवारी (दि.६) शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत कशी लढत राहील, आपण महाविकास आघाडीसोबत लढलो तर काय होईल, इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल या बाबतचा लेखाजोखा जगताप यांनी पवारांकडे मांडला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांनी बोलताना निर्णयाची माहिती दिली. कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांनी आंदोलने, बैठकांच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवला आहे. त्यामुळे त्यांचा एकत्र येण्यास विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच महापालिकेची निवडणुक लढवावी अशी भुमिका पवारांकडे मांडल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यावर पवार यांनी सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणुन लढण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशीही पवारांचे बोलणे झाल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवू, असे जगताप यांनी स्पष्ट केले.