पुणे : साहित्य-संस्कृती, कलांवर प्रेम करणारे पुणेकर उद्या (११ डिसेंबर) एक तास वाचनासाठी देणार आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम उद्या शहरभरात राबवला जाणार असून, दुपारी १२ ते १ या कालावधीत आपल्याला आवडीचे किंवा जवळ असलेले कोणतेही पुस्तक वाचन करतानाचे छायाचित्र काढून ते pbf24.in/register या लिंकवर पाठवायचे आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यंदा अधिक भव्य स्वरुपात महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या अनुषंगाने वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी, नव्या पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी वाचनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी उद्या (११ डिसेंबर) ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील शाळा, उच्च शिक्षण संस्था, ग्रंथालये, शासकीय कार्यालये, पुणे विमानतळ, मेट्रो स्टेशन्स अशा विविध ठिकाणी एक तास वाचनासाठी दिला जाणार आहे.
शहरात ठिकठिकाणी वाचन करतानाच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अप्पा बळवंत चौकातही ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम होणार आहे. त्यात पुस्तक विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते, विद्यार्थ्यांसह साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी अप्पा बळवंत चौकाचे सुशोभीकरण करून वाचकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी वाचन व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेकडून बुधवारी लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पायी फिरणाऱ्या पुणेकरांनी काही वेळ वाचनासाठी द्यावा या उद्देशाने लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांमध्ये पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याने मनसोक्त खरेदी करतानाच वाचनानंदही घेता येणार आहे.