पुणे – प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हे प्रकरण गाजत असताना बोगस महिला आयएएस ऑफिसरचे प्रकरण लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाल आहे. ही महिला स्वत:ला आयएएस असल्याचे सांगत होती. तसेच तिने व्हॉट्सअॅप डीपी, फोन पेच्या डीपीला आयएएस आणि राजमुद्रेचे छायाचित्र ठेवले होते. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीसह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वडकी येथे रहाणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार रेणुका ईश्वर कानपुरे (३२) रा. वडकी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मेस चालवते. तर तिचा पती खासगी वाहनावर चालक आहे. त्यावेळी रेणुका त्यांच्याकडे चपात्या विकत घेण्यासाठी येत होती. तेव्हा ती आपण आयएएस परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगायची. दरम्यान, फिर्यादीला गाडीचे हप्ते भरण्यासाठी पैशांची गरज असल्याने तिने रेणुकाकडून २०२२ मध्ये ६० हजार रुपये हप्त्याने घेतले होते. यासाठी प्रतिमहिना पाच टक्के व्याज लावण्यात आले होते. त्यानंतर आणखी पैशांची गरज लागल्याने ५० हजार दहा टक्के व्याजाने घेतले. पण, परतफेड करुनही मुद्दलची रक्कम वाढत होती. तसेच हप्ता लेट झाल्यावर दर दिवशी २०० रुपये दंड लावला जात होता. यामुळे महिन्याचा हप्ता थकल्यास दंडाची रक्कमच सहा हजार होत होती. दरम्यान, मागील वर्षभरापासून रेणुका आणि तिचा पती ती आयएएस ऑफिसर झाल्याचे सांगत फिरत होते. फिर्यादीने रेणुका यांना २ लाख ६८ हजारांच्या बदल्यात ८ लाख रुपये परत दिले होते. मात्र, तरीही ती आणखी साडेचार लाखांची मागणी करत होती. फिर्यादीने रक्कम देण्यास नकार दिल्यावर रेणुकाने तिला “मी आयएएस ऑफिसर आहे लक्षात ठेव. सगळी सिस्टीम हालवून सोडेल. पैशांच्या जोरावर सगळ्यांना मॅनेज करेल, तुझ्या पतीचा अपघात करेल, तुझी मुले बाहेर असतात लक्षात ठेव,’ अशी धमकी दिली. “आरोपी रेणुका ही परिसरात भिशी घेत असते. त्यामुळे तिचा अनेक महिलांशी संपर्क आहे. त्यांनाही ती आयएएस ऑफिसर असल्याचे सांगत होती. तिने मोबाइलच्या डीपीलाही तसे ठेवले. तर, तिचा पतीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.” – शशीकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर.