Pune News: महाराष्ट्र हादरला! बारमध्ये काम करणाऱ्या वेटरच्या खोलीत दोन चिमुरड्यांचे मृतदेह

रामचंद्र सोनवणे | राजगुरुनगर : राजगुरूनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारमध्ये काम करणाऱ्या वेटरच्या खोलीमध्ये आठ आणि नऊ वर्षांच्या २ लहान मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये सापडले आहेत. ही दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून, या घटनेमुळे राजगुरूनगर शहरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे
राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी (दि २६) हा किळसवाणा आणि भयानक प्रकार उघडकीस आला. कार्तिकी सुनिल मकवाने, वय ९ वर्ष व दुर्वा सुनिल मकवाने, वय ८ वर्ष अशी मयत मुलींची नावे आहेत.
या दोन्ही बहिणी बुधवारी (दि. २५) दुपारी खेळताना गायब झाल्यावर त्यांचा शोध घेण्यात आला. मुली न सापडल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती. मयत मुलीचे वडील राजगुरुनगर लगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी असुन पत्नी मोलमजुरी करतात.
हरवलेल्या मुलींचा तपास करताना खेड पोलीसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ लगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी अवघे गुडघा भर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये या दोन्ही बहिणी मृत अवस्थेत मिळुन आल्या, असे पोलिसांनी सांगितले. दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत.
खेड तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जवळपास ५० वर्षांचा आरोपी असुन त्याने हे अघोरी कृत्य केले आहे. या लहान बहिणींचा खून का करण्यात आला, याबाबतचा पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान काही तासातच पुणे क्राईम ब्रांच व खेड पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे. एका ५० वर्षीय संशयित आरोपीला पुण्यातील एका लॉजवरून अटक करण्यात आली आहे. पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले, हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळुन आल्या आहेत. सखोल चौकशी सुरू आहे.





