पुणे: कचरावेचकांचे काळ्या फिती बांधून काम

पुणे – कचऱ्याच्या प्रश्‍नाबाबतची कंत्राटीकरणावरील चर्चा महानगर पालिकेकडून सुरू असल्याने “स्वच्छ’ संस्थेच्या कचरा वेचकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या अनुषंगाने कचरा वेचक काळ्या फिती बांधून काम करत आहेत.

शहरातील सुमारे 3 हजार 500 कचरा वेचकांच्या कामाविषयी असणारी पालिकेची अनास्था, स्वच्छ संस्थेला तात्पुरती मिळणारी मुदतवाढ आदीच्या पार्श्‍वभूमीवर कचरा वेचकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शहरात विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांनी घोषणांचे फलकांद्वारे निषेध व्यक्‍त केला.

आगामी काळात कचरा वेचक काम थांबवणार नाहीत. मात्र, कामावर उपस्थित राहताना ते आपला निषेध नोंदवण्यासाठी काळ्या फिती बांधणार असून, नागरिकांना समर्थन देण्यास आवाहन करणार आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यावर काळजी घेत, न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा कचरा वेचकांनी दिला असल्याचे संस्थेकडून जाहीर करण्यात आले.

प्रोत्साहन भत्ता, सुरक्षा साहित्यच मिळत नाही
करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान आम्हाला आश्‍वासित केलेला प्रोत्साहन भत्ता, महानगरपालिकेने मान्य केलेला आयुर्विमा, काम करण्याचे साहित्य आदी पोहोचत नाही. पण आमच्या उपजीविकेच्या कंत्राटीकरणाबद्दलच्या चर्चांना वेग येतो हे चीड आणणारे आहे. करोनामध्ये काम करताना आमच्या भगिनींचे निधन झाले, तरीही आम्ही न थांबता काम सुरू ठेवले. याची जाणीव तरी पालिकेला आहे का, अशी भावना कचरा वेचकांनी व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.