पुणे -कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील प्रत्येकी 3 नावे प्रदेश समितीने केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. केंद्रीय संसदीय मंडळाकडून लवकरच दोन्ही उमेदवार नावे जाहीर केली जातील. मात्र, पक्षाकडून दि. 6 फेब्रुवारीला दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरले जातील, अशी घोषणा भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
पोटनिवडणूक निमित्ताने भाजपने पहिल्यांदाच महायुतीतील घटक पक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बैठकीस बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं आठवले गट यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कसबा मतदार संघातील इच्छुक उमेदवारही उपस्थित होते. पाटील म्हणाले, “या पोटनिवडणुकीबाबत आजपर्यंत अनेक बैठका झाल्या. दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत, यासाठी भाजपने सर्वपक्षांच्या नेत्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच निवडणुकीसाठी रणनीतीकार म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांची सर्व पक्षप्रमुखांशी चर्चा करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्या संवाद साधत आहेत. इच्छुक उमेदवारांची नावे आम्ही केंद्रीय समितीला पाठवली आहे. सायंकाळपर्यंत उमेदवार घोषित होऊ शकतो. ही निवडणूक बिनविरोध होईल, असे अजूनही वाटत आहे. पण, आम्ही गाफील राहणार नाही. आम्ही निवडणुकीची तयारी केली आहे.’
पद असणाऱ्यांनाही मिळू शकते तिकीट
कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना भाजपने प्रदेश प्रवक्तेपद दिल्याने त्यांचे तिकीट कापले जाणार का, असा प्रश्न यावेळी पाटील यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले., “असे म्हणता येणार नाही. प्रवीण दरेकर यांच्यांकडे पक्षाने अनेक पदे दिली आहेत. अशी अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत. त्यामुळे कोणाला पक्ष संघटनेचे पद दिले, तर त्यांना आमदारकीचे तिकिट दिले जाणार नाही असे होत नाही. त्यामुळे कोणालाही उमेदवारी मिळू शकते.’
प्रत्येकाने चार अर्ज
आणून ठेवा..
भाजपने इच्छूक उमेदवारांना प्रत्येकी 4 अर्ज आणून ठेवण्याच्या सूचना शुक्रवारच्या बैठकीत दिल्या. उमेदवार निश्चित नसला तरी सर्वांनी अर्ज आणि कागदपत्रे तयार ठेवावीत. दि. 6 रोजी दोन आणि दि. 7 रोजी दोन अर्ज तिकीट जाहीर झालेल्या उमेदवाराने भरायचे आहेत. पक्षाकडून संघटनेतील पदाधिकारी तसेच शहरातील प्रमुख पदाधिकारीही मदतीला असतील,’ अशा सूचना देण्यात आल्या.