पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे अनेक पक्षसंघटनेतील पदाधिकारी आमदार झाले आहेत, तसेच निवडणुकीनंतर भाजपकडून स्थानिक संघटन पातळीपासून प्रदेशापदापर्यंतच्या बदलांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने आता शहराध्यक्षांची निवडही नव्याने घेण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत. असे असतानाच आता पुणे शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीने महापालिका निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. या मागणबाबत बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते. ज्या शहरात संघटनेत गटबाजी आणि तक्रारी नाहीत, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत कायम ठेवण्याचे विचाराधीन असल्याचे या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे. भाजपकडून शहरांमधील अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यासह संघटनेतील विविध समित्या व त्यांच्या अध्यक्ष बदलांच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यासाठी नुकतीच शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत या निवडीच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत, तर विद्यमान कार्यकारिणीला दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला असून, त्यात लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता बदलाची प्रक्रिय सुरू होताच काही शहर पदाधिकाऱ्यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आमच्या कार्यकारिणीच्या कालावधीत झाल्या. त्यात पक्षाला पुण्यात चांगले यश मिळाले. आमच्या कार्यकारिणीला केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका होईपर्यंत शहराध्यक्षांसह हीच कार्यकारिणी कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी केल्याची चर्चा आहे.