Pune : कामांची तपासणी करूनच बिले द्यावी

पुणे : महापालिकेचे आर्थिक वर्ष संपत असल्याने मागील वर्षभरात केलेल्या कामांची बिले प्रशासनाला सादर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २२ मार्च ही अंतीम तारीख दिली आहे.
मात्र, महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून काही कामे न करताच थेट बनावट प्रमाणपत्र सादर करून कोटयावधीचा निधी लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी विरोधीपक्ष नेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे. तसेच, ही सादर होणारी बिले कामांची तपासणी केल्या शिवाय दिली जावू नयेत अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत बोलताना केसकर म्हणाले की, अंदाजपत्रकातील प्रस्तावित कामे करणे महापालिका अभियंत्यांचे काम आहे. त्यानुसार, ही कामे झाली की नाहीत, याची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. मात्र, मार्च अखेरीचे कारण पुढे करत ही बीले काढण्यात येत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे कामे न करताही बीले सादर झालेली असल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत तातडीनं ड्रेनेज विभागाच्या कामांची तपासणी करावी अशी मागणी केसकर यांनी केली आहे.




