Pune : गोल्फ क्लबमधून मारलेला चेंडू लागल्याने दुचाकीस्वार जखमी

पुणे : येरवड्यातील गोल्फ क्लबमधून मारलेला चेंडू दुचाकीस्वार तरुणाच्या छातीवर आदळल्याची घटना नुकतीच घडली. चेंडू लागल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोल्फ क्लब व्यवस्थापन तसेच अज्ञाताविरुद्ध दुखापत केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
प्रणील अनिल कुसळे (वय ३५, रा. येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कुसळे आणि त्यांचे मित्र संदीप भातकर यांच्यासोबत दि. २९ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास येरवड्यातील उड्डाणपुलावरुन निघाले होते.
त्यावेळी गोल्फ क्लबमधून गोल्फ खेळताना मारलेला चेंडू त्यांच्या छातीवर आदळला. त्यानंतर चेंडू तेथून जाणाऱ्या एका वाहनावर आदळला. या घटनेत कुसळे यांच्या छातीला दुखापत झाली. कुसळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार रेड्डी तपास करीत आहेत.





