Pune : सवलतीच्या क्रीडा गुणांच्या प्रस्तावाच्या शुल्कासाठी भुर्दंड

पुणे : राज्यातील इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे सवलतीच्या क्रीडा गुणांच्या प्रस्तावासाठी राज्य मंडळ आणि आपले सरकार संकेतस्थळ यांच्याकडून स्वतंत्र शुल्क आकारणी करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येतात.
जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीयस्तरासाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार सवलतीचे गुण दिले जातात. क्रीडा गुणांसाठी गेल्या वर्षीपर्यंत त्यासाठी प्रत्यक्ष अर्ज (ऑफलाइन) करावा लागत होता. यंदा या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांनी आपले सरकार संकेतस्थळावर प्रत्येक खेळाडूची स्वतंत्रपणे नोंदणी करणे, त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे प्राचार्य, मुख्याध्यापक, खेळाडूने स्वसाक्षांकित करून संकेतस्थळावर सादर करण्याच्या सूचना क्रीडा विभागाने दिल्या.
ऑनलाइन प्रक्रियेव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाइन अर्जांवर शिफारस करून ते राज्य मंडळाला पाठवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या अर्जासाठी आपले सरकार संकेतस्थळाकडून २३ रुपये ६० पैसे शुल्क आकारण्यात येते. राज्य मंडळाचे २५ रुपये शुल्क भरण्याचे निर्देश शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीपर्यंत क्रीडा गुणांचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे जमा केले जात होते. त्या वेळी शुल्क आकारणी केली जात नव्हती. यंदा ऑनलाइन अर्जांसाठी स्वतंत्र शुल्क कशासाठी, असा प्रश्न क्रीडा शिक्षिकांनी उपस्थित केला. दोन स्वतंत्र शुल्क आकारणी केली जात असल्याने काही शाळा-महाविद्यालये खेळाडू विद्यार्थ्यांकडून शुल्काची रक्कम घेतात.





