Pune News : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात ड्रेनेज कामानंतर रस्ता योग्यरीत्या न दुरुस्त केल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सोमवारी खडी वाहतूक करणारा टेम्पो खड्ड्यात अडकल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. (Pune News) नागरिकांमध्ये ठेकेदार व प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. शहरातील रस्ते कामांमधील निष्काळजीपणाचा आणखी एक प्रकार भारती विद्यापीठ परिसरात समोर आला आहे. त्रिमूर्ती चौकात ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून बुजवण्यात आला. (Pune News) मात्र ही माती व्यवस्थित दाबली न गेल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. यातच सोमवारी सकाळी खडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे चाक खड्ड्यात अडकले. रस्त्याच्या मध्यभागी वाहन अडकल्याने चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. (Pune News) कामावर जाणारे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत ठेकेदार व प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. “काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित न केल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. (Pune News) वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना गर्दीच्या वेळेत तीन ते चार वॉर्डन तैनात करावे लागत आहेत. तरीही भर चौकात वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. वाहतूक पोलिसांनी संबंधित ठेकेदाराला रात्रीच्या वेळेत काम करण्याची परवानगी दिली होती. (Pune News) तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत डांबरी करण्याचे लेखी आश्वासनही घेतले होते. काही लोकप्रतिनिधी या परवानगी प्रक्रियेत सक्रिय होते; मात्र सध्याच्या समस्येकडे ते दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. (Pune News) दरम्यान, धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. (Pune News) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गर्दीच्या वेळी वाहतूक कर्मचारी आणि वॉर्डन नियुक्त करण्यात आले आहेत. -प्रियंका गोरे, सहायक पोलीस निरीक्षक