Pune : अंध बांधवांसाठी भारत ई-सेवा केंद्राची सुरुवात; रोटरी क्लबचा उपक्रम
Pune : समाजातील दृष्टिबाधित नागरिकांना केवळ सहानुभूती न देता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर (Rotary Club of Pune Lokmanyanagar) यांच्या वतीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

Pune : समाजातील दृष्टिबाधित नागरिकांना केवळ सहानुभूती न देता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर (Rotary Club of Pune Lokmanyanagar) यांच्या वतीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. अंधजन विकास ट्रस्टच्या सहकार्याने बालाजीनगर येथे भारत ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक संगणक व मशिनरी भेटस्वरूपात देण्यात आली.
या उपक्रमासाठी विनोद एन्टरप्रायजेज आणि रिव्हेल क्रिएशन्स यांचे सहकार्य लाभले. या केंद्राच्या माध्यमातून अंशतः दृष्टिबाधित हर्षदा उकीरे या झेरॉक्स तसेच विविध नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देत कायमस्वरूपी उत्पन्न मिळवू शकणार आहेत.
उपक्रमाचे संकल्पक रो. महेश घोरपडे यांनी सांगितले की, “दृष्टिबाधित व्यक्तींना केवळ सहानुभूतीने न पाहता त्यांना समाजाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारचे कायमस्वरूपी अर्थार्जनाचे उपक्रम राबविण्याची गरज आहे.”
भारत ई-सेवा केंद्राचे उद्घाटन माजी नगरसेवक कुणाल टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बागडे, विनोद साकला, अंधजन विकास ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भोर, उपाध्यक्ष नारायण देसाई तसेच रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना कुणाल टिळक म्हणाले, “समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी रोटरी क्लबकडून राबविले जाणारे हे कार्य कौतुकास्पद आहे. पुणे महानगरपालिकेच्या रोजगार मेळाव्यांमध्ये यंदा दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विशेष सहभागाची व्यवस्था करण्यात येईल. तसेच पात्र व्यक्तींना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.”
दरम्यान, पुणे शहरातील विविध भागांत अशा प्रकारची भारत ई-सेवा केंद्रे सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बागडे यांनी दिली.





