पुणे – शहरात गेल्या दोन वर्षांत प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी मनपा हद्दीतील 21 प्रमुख अपघात प्रवणक्षेत्र ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) माहिती महापालिकेस पाठवली आहे. यात सर्वाधिक सात ठिकाणे हे पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पूल ते डुक्कर खिंड या अंतरातील आहेत. या ठिकाणांवर वर्षभरात तब्बल 104 अपघात झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार, शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2020 ते सन 2022 काळात 500 मीटर क्षेत्रात मागील सलग 3 वर्षांमध्ये एकूण 5 प्राणांतिक किंवा गंभीर अपघात अथवा एकुण 10 व्यक्ती (1 किंवा एकापेक्षा जास्त अपघात मिळून) मृत झाले असतील, अशा 21 ठिकाणांची वाहतूक शाखेने नव्याने निश्चिती केली आहे. त्यानुसार, तीन वर्षांतील अपघातांचे विश्लेषण करून महापालिकेस ही यादी पाठवण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने तातडीने या 21 ठिकाणांवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे पत्र पोलिसांनी दिले आहे. मात्र, ही सर्व ठिकाणे महामार्गावरील असल्याने महापालिकेस उपाययोजना करणे शक्य आहे, की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. ही आहेत प्रमुख अपघाती ठिकाणे कात्रज चौक, दरी पूल, नवीन कात्रज बोगदा, माई मंगेशकर हॉस्पिटलसमोर, मुठा नदी पूल (वारजे), डुक्कर खिंड, नवले पूल, नवले पूल सेल्फी पॉइंट, आयबीएम कंपनी परिसर (हडपसर), रविदर्शन चौक (हडपसर) कदमवाक वस्ती, लोणी स्टेशन चौक, थेऊर फाटा चौक (लोणी काळभोर), टाटा गार्डरूम (चंदननगर), खराडी बायपास चौक, रिलायन्स मार्ट (चंदननगर), खराडी जकात नाका, विमाननगर चौक, विमानतळ चौक, मुंढवा रेल्वे पूल, पालखी विसावा तळ (वडकी)