ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली भेट पुणे – प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेऊन विचारपूस केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दहा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले आहे. बाबांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. आढाव यांचे सुपुत्र असीम आणि अंबर यांनी प्रसार माध्यमांना निवेदनाद्वारे सांगितले. आमचे वडील आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि अन्य तज्ज्ञांतर्फे उपचार चालू आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. बाबांच्या प्रकृतीविषयी वेळोवेळी माहिती दिली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. पवार यांनी दुपारी डॉ. आढाव यांची भेट घेतली. त्यांना उपचार देणाऱ्या डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते. डॉ. आढाव यांच्या पत्नी, मुले यांच्याकडे प्रकृतीची विचारपूस करून माहिती घेतली.