Pune : आज्जीबाई अडकल्या इन्सपेक्टर पिसेच्या जाळ्यात

पुणे : एका सायबर भामट्याने नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पिसे बोलत असल्याचे सांगत एका ७६ वर्षाच्या महिलेला तब्बल २१ लाख ६५ हजाराचा गंडा घातला आहे. या महिलेने बँकेतील सर्व रक्कम तसेच मुदत ठेवी मोडून ती रक्कम भामट्याच्या खात्यात वर्ग केली. याप्रकरणी अलंंकार पोलीस ठाण्यात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथे फिर्यादी (वय ७६) महिला तीच्या मुलासोबत राहाते. ती घरी असताना, डीओसीमधून बोलत आहे, तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला असून नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने त्याचा वापर मनी लॉंड्रीगसाठी केला असल्याचे सांगितले. या गुन्ह्यात अटक करण्यात येईल, असे सांगून त्यांचा कॉल नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात जोडून देत असल्याचे भासवले. यानंतर समोरील व्यक्तीन पोलीस निरीक्षक पिसे बोलत असल्याचे सांगत तुमचे आधारकार्ड कसे लिंक झाले, घरी कोण कोण आहे असे विचारत, आम्ही तुम्हाला केसमधून सोडवण्यासाठी मदत करू पण कोणाला काही सांगायचे नाही, असे म्हणत कॉल ठेवला.
दुसऱ्या दिवशी त्यांना एक व्हिडिओ कॉल आला. त्यामध्ये पोलीस पोषाखातील व्यक्ती पोलीस निरीक्षक पिसे म्हणून बोलत होती. त्याने मनी लॉंड्रीगची चौकशी करायची असल्याचे सांगत बँक आणि मुदत ठेवींची माहिती घेतली. यातील सर्व रक्कम एकूण आठ बँक खात्यात वर्ग करण्यात आली, त्यांनी समोरील व्यक्तीला पैसे कधी भेटतील, असे विचारल्यावर चौकशी झाल्यावर भेटतील असे त्याने सांगितले. दरम्यान, फिर्यादीने त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीला हे सांगितल्यावर त्याने फसवणूक झाल्याचे निदर्षणास आणून दिले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.





