Pune : वाघोलीतील १२५ कोटींची १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न

पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका महिलेला जागामालक असल्याचे भासवून वाघोली येथील तब्बल १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात चंदननगर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांवर फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जमिनीची किंमत बाजारभावानूसार १०० ते १२५ कोटीच्या आसपास आहे.
या गुन्ह्यात आनंद लालासाहेब भगत (केसवड वस्ती, वाडेगाव, ता. हवेली), शैलेश सदाशिव ठोंबरे (रा. ससाणेनगर, हडपसर), तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावरसिद्ध लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा ऊर्फ अर्चना पटेकर (रा. इस्लामपूर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील भगत याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दि. २० मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. हा प्रकार २०२२ ते मे २०२३ दरम्यान घडला. चंदननगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वाती रामनाथ खेडकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
लेटीगेशन टाकून सेटलमेंटचा प्रयत्न…
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. वाघोली भागातील गट क्र. १२७६, हिस्सा ३८ येथे अपर्णा यशपाल वर्मा यांच्या नावे १० एकर जमीन आहे. त्या दुबईला वास्तव्यात असतात. ही जमीन हडपण्याचा कट आरोपींनी रचला. या कटाअंतर्गत अर्चना पटेकर हिला बनावट नाव (अपर्णा यशपाल वर्मा) वापरून मूळ मालक असल्याचे भासवले. खोटे आधार कार्ड, पॅन कार्डद्वारे बनावट दस्त तयार केले. २०२२ ते १७ मे २०२३ या कालावधीत हवेली निबंधक कार्यालय क्र. ७ येथे खरेदीखताची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर भगत याने २०२३ मध्ये मूळ जागा मालक अपर्णा वर्मा यांनीच बनावट दस्त तयार करुन सदर जमीन मला विक्री केल्याची खोटी एफआयआर चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल केली. यातून अपर्णा वर्मा यांना सेटलमेंटला बोलावून जमीन स्वस्तात लाटायची असा कट होता. मात्र, तपास करताना एफआयआरचा खोटी नोंदवल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व प्रकरण पुढे आले. दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यावर अपर्णा वर्मा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे पुढील तपास करीत आहेत.
महत्त्वपूर्ण कागदपत्रे आढळली
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आनंद भगत यांच्या वाडेगाव येथील राहत्या घरी झडती घेतली. येथून पोलिसांनी वेगवेगळ्या नावाने असलेले दस्तावेज, झेरॉक्स प्रत, खरेदीखत, संमतीपत्रे, करारनामे, वीजबिल इत्यादी कागदपत्रे जप्त केली. अपर्णा वर्मा नावाने बनावट कागदपत्रांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती समोर आल्या आहेत.
आरोपींची संख्या वाढणार…
यातील शैलेश ठोंबरे हा तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांचा मेहुणा आहे. आरोपींनी संगनमताने ही फसवणूक केली. या प्रकरणात बनावट महिलेच्या नावे दस्त नोंद झाली. तर, एका बड्या बांधकाम व्यवसायीकाच्या सांगण्यानुसार हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.




