पुणे – हवेली तालुक्यातील खेडशिवापूर येथील श्रीरामनगर येथे राहणाऱ्या वाडकर कुटुंबावर गुरुवारी (११ जुलै) सायंकाळी घरात घुसून कोयता, लोखंडी सळई व इतर हत्यारांनी हल्ला करण्यात आला. यामध्ये लोकेश अदिनाथ वाडकर (२३) या तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात आय.सी.यू.मध्ये उपचार सुरू आहे. ही घटना केवळ मोटरसायकल लावण्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर घडल्याचे समोर आले आहे. फिर्यादी अदिनाथ शंकर वाडकर (४९, व्यवसाय शेती रा. कोंढणपूर फाटा, श्रीरामनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, हल्लेखोर अर्जुन प्रमोद रजपूत, रोहन रजपूत, तेजस रजपूत, करण रजपूत (सर्व रा. शिवापूर) व त्यांच्यासोबत आलेले दोन ते तीन अनोळखी व्यक्ती गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी वाडकर व त्यांच्या मुलगा लोकेश यांना शिवीगाळ करत कोयता, लोखंडी सळई व लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केली. ही घटना केवळ मोटरसायकल लावण्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर घडल्याचे समोर आले आहे. फिर्यादी यांचा दुसऱ्या मुलाशी आरोपी अर्जुन याचे रस्त्यावर वाद झाले होते. यानंतरच हा घातपात घडवून आणला गेला. हल्ल्यावेळी घरात पाहुणे दत्तात्रय जरांडे आणि हनुमंत चोरघे उपस्थित होते. त्यांनी सोबत मिळून जखमी लोकेशला प्रथम श्लोक हॉस्पिटल, खेडशिवापूर येथे दाखल केले. परंतु डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याला तत्काळ भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. राजगड पोलीस ठाण्यात अर्जुन रजपूत व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शंकर नासा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.