Pune : एटीकेटीवाल्यांनाही अकरावी प्रवेश

पुणे : राज्य माध्यमिक- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेत एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटी सुविधे अंतर्गत अकरावीला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत तात्पुरता प्रवेश मिळणार आहे.
राज्यातील ९ हजार ५०० कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीची प्रवेश क्षमता २१ लाखापेक्षा जास्त असली तरी दहावीत उत्तीर्ण होणाऱ्यांची १३ लाख ८७ हजार आहे. अन्य मंडळांच्या शाळांतून १ लाख ४० हजार उत्तीर्ण उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे राज्यातील १५ लाख २० हजार विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत.
यातील १३ लाख विद्यार्थी अकरावीला जातात तर अन्य विद्यार्थी व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण, नर्सिंगला प्रवेश घेतात. अकरावी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली असून त्यात विद्यार्थ्यांचे गुणांचे विवरण, राज्यातील गुणवत्ता क्रमांक दिला आहे. प्रवेश फेरीच्या पाचही टप्प्यांवर कोणत्याही विद्यार्थ्याला नोंदणी, प्राधान्यक्रम भरता येणार आहेत.
एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची सोय दहावीच्या जुलैमधील पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर म्हणजे पहिल्या फेरीनंतर दिली जाईल. एटीकेटी धारकांना विज्ञानासाठी दहावीत विज्ञानामध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशासाठी अन्य मंडळाची एटीकेटी सवलत लागू असणार नाही, असे प्रभारी शिक्षण संचालक डॉ.श्रीराम पानझाडे यांनी स्पष्ट केले आहे.





