-पुणे -पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) उपनगर परिसरात 56 मार्गावर सुरू असलेली अटल सेवा (डेपो कोअर सिटी) तोट्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तोट्यातील 28 मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर 28 मार्गावर नियमित तिकीटदराप्रमाणे सेवा दिली जाणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मात्र थोडीशी झळ बसणार आहे.
पीएमपीकडून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी अटल सेवा शहर व उपनगर परिसरात 25 ऑक्टोंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रूपये तिकीट असल्यामुळे काही मार्गांवर नागरिकांचा या सेवेला चांगला प्रतिसाद होता. शहराच्या मध्य भागात “दस मे बस’ ही पुण्यदशम बसची सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे सुरवातीला शहराच्या मध्यवस्तीमधील अटल सेवा बंद करण्यात आली होती. पण, उपनगर परिसरात असलेल्या डेपोपासून पाच किलोमीटर अंतरावर जाणाऱ्यांसाठी अटल सेवा सुरू होती. या सेवेच्या 56 मार्गावर 143 फेऱ्या सुरू होत्या. पण, पीएमपीने या मार्गाची पाहणी केली असता त्यावेळी अटल सेवा सुरू असलेल्या काही मार्गावर प्रवासी व उत्पन्न कमी असल्याचे आढळून आले होते.
पीएमपी सध्या सुरू असलेल्या 56 पैकी 28 मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ज्या मार्गावर प्रवासी संख्या चांगली आहे. अशा 28 मार्गावर पीएमपीच्या 51 फेऱ्या सुरू राहणार आहेत. पण, या बसला आता प्रवाशांना नियमित तिकीट दराप्रमाणे तिकीट द्यावे लागणार आहे. पीएमपीने 19 फेब्रुवारी पासून हा निर्णय लागू केला आहे.