Pune: तब्बल सव्वापाच हजार पोलीस आॅन ड्युटी; विधानसभा निवडणूक मतदानासाठी प्रशासनाची तयारी

पुणे – विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून मतदान केंद्रांबाहेर कडेकोट बंदोबस्त असणार आहे. याचा आढावा मागील दोन दिवसांपासून घेतला जात आहे. बंदोबस्तासाठी १२ पोलीस उपायुक्त, २२ सहायक पोलीस आयुक्तांसह ५ हजार २५५ पोलीस कर्मचारी , १८७० होमगार्ड तैनात असणार आहेत. यासोबतच बॉंम्ब शोधक नाशक पथक, शीघ्र कृती दल आणि केंद्रीय निमलष्करी दल कार्यरत असणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले, आचार संहिता लागल्यापासून पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरवात केली होती. गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करुन बेकायदा मद्य, गुटखा, जुगार अड्डयांवर छापे टाकण्याबरोबरच बेकायदा शस्त्रेही जप्त केली आहेत. गुन्हेगारांवर विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. आता मतदानाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्ताची तयारी सुरु केली आहे.
शहरात ७१६ इमारतींमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. त्यांची विभागणी १६८ सेक्टरमध्ये करण्यात आली आहे. तेथे सहायक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक असतील. या केंद्रांवर कॉल मिळताच दोनच मिनिटांत गस्ती पथकाची वाहने पोचहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबत १३१ ठिकाणीही नाकाबंदी करण्यात येणार आहे.
पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची फिरती पथके असणार आहेत. तसेच सीसीटीव्हीव्दारे लक्षही ठेवले जाणार आहे. गुन्हे शाखेची ४० पथके त्यामध्ये ३०० कर्मचारी गोपनीयरित्या कार्यरत असणार आहेत. तसेच ७४ संवेदनशिल केद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
रात्रीची विशेष गस्त
मतदारांना मतदानाच्या दोन दिवस अगोदर आमिष दाखवले जाते, तसेच पैशांचा वाटपही केला जातो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची विशेष गस्त कार्यरत केली आहेत. तसेच सकाळचीही गस्त असणार आहे. वारजे ,संगमवाडी, नागपूर चाळ, जनता वसाहत , नाना पेठ अशा संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.





